हर्षवर्धन त्रिपाठी आणि प्रबल सरण अग्रवाल
[११ जून रोजी रामप्रसाद बिस्मिल यांच्या जन्मदिवसानिमित्त प्रकाशित]
रामप्रसाद बिस्मिल यांचे ‘सरफरोशी की तमन्ना’ हे गीत जनमानसामध्ये प्रसिद्ध आहे.
त्यांचे नाव ‘काकोरी कटाच्या’ घटनेमुळे जनतेच्या मनावर कोरले गेले आहे. धाडसी ट्रेन-लूटीच्या या घटनेने उत्तर भारतातील क्रांतिकारी चळवळीने दिशा बदलली. तथापि उजव्या विचारसरणीने बिस्मिल यांचे पुरेपूर भगवीकरण करण्याच्या प्रयत्न केला आहे.
सध्या असंख्य स्वस्त चरित्रे आणि छोटी पुस्तके आहेत जे त्यांना हिंदुत्वाच्या राजकारणाचे प्रतीक म्हणून सादर करतात. इतर सर्व क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिकांपेक्षा बिस्मिलने मोठ्या संख्येने पुस्तके आणि लेख लिहिले. असे असुनसुद्धा वास्तविकतेचा काहीही संबंध नसलेले बिस्मिलचे हिंदुत्वीकरण हे यशस्वी झाले आहे कारण त्यांच्या वर आणि त्यांच्या विचारधारेवर फारच कमी अभ्यास झाला आहे.
जीवन रूपरेषा (थोडक्यात)
उर्दू आणि हिंदी भाषेचा एक उत्तम कवी असलेल्या बिस्मिलचा जन्म ११ जून, १८९७ रोजी उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूरमधील निम्न-मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. बिस्मिलचे पूर्वज बुंदेलखंड प्रांतातील होते. हा प्रांत रूढीवादी समाज आणि बंडखोर वृत्तीच्या दरोडेखोरांसाठी प्रसिद्ध होता.
आजूबाजूच्या सामाजिक पुराणमतवादामुळे अस्वस्थ झालेला बिस्मिल हा अगदी लहान वयातच एक अतिशय श्रद्धाळू आर्य समाजी बनला आणि त्याचे गुरु स्वामी सोमदेव यांच्या प्रभावाखाली ब्रिटिश साम्राज्याविरोधी संघर्षात ओढला गेला. स्वामी सोमदेव यांनी बिस्मिलला इटालियन देशभक्त मॅझीनी आणि इतर साथींच्या लिखाणाची ओळख करुन दिली. बिस्मिलने १९१६ च्या लखनौतील कॉंग्रेसच्या अधिवेशनात हजेरी लावली आणि त्यांचा संपर्क मातृवेदी म्हणून ओळखल्या जाणार्या ब्रिटीशविरोधी भूमिगत क्रांतिकारक संघटनेशी झाला.
त्याच वर्षी त्याने ‘अमेरिका को स्वाधीनता कैसे मिली’ हे पुस्तक प्रकाशित केले ज्यामध्ये त्याने एखाद्या देशाला प्रगत होण्यासाठी राजकीय स्वातंत्र्य गरजेचे आहे आणि ते मिळवण्यासाठी सशस्त्र संघर्ष सर्वात जास्त व्यवहार्य पर्याय आहे अशी भूमिका मांडली. १९१८ मध्ये त्याने ‘देशवासीयो के नाम संदेश’‘ हे पत्रक प्रकाशित केले ज्यामध्ये ब्रिटीशांविरुद्ध सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र होऊन लढावे असे आवाहन केले. ब्रिटिश सरकारने जवळपास सर्व मातृवेदी क्रांतिकारकांना अटक केली पण बिस्मिल त्यातून निसटण्यात यशस्वी ठरले.
१९२० मध्ये त्याने ‘सुशील माला’ नावाने प्रकाशनगृह सुरू केले आणि बोलशेविकों की करतूत (रशियन क्रांतिकारक चळवळीवर आधारित कादंबरी) प्रकाशित केले तसेच मन की लहर कवितासंग्रह आणि कॅथरीन या रशियन समाजवादी क्रांतिकारक, कॅथरीन ब्रेशकोव्हस्की यांचे चरित्र प्रसिद्ध केले. असहकार चळवळीच्या वेळी त्यांनी स्वदेशी रंग नावाचा कवितासंग्रह छापला. त्याकाळी बिस्मिल अग्यात व इतर टोपण नावाने आज, वर्तमान, प्रभा इत्यादी नियतकालिके चालवायचे.
असहकार चळवळीच्या अपयशानंतर क्रांतिकारक रशियाची समाजवादी क्रांती आणि गांधीवादी संघर्षात जागृत झालेल्या शेतकरी व तरूणांमुळे प्रेरित होऊन हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन या नावाने पुन्हा संघटित झाले. त्यांनी द रिवोल्यूशनरी नावाचे एक पत्रक प्रसिद्ध केले ज्यामध्ये त्त्यांनी जाहीर केले की “माणसाकडून माणसाचे होणारे शोषण’ बंद होईपर्यंत त्यांचा संघर्ष चालूच राहील.
९ ऑगस्ट, १९२५ रोजी बिस्मिल यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारकांनी लखनौजवळ काकोरी येथे रेल्वे थांबवून सरकारी तिजोरी लुटली. यातुन मिळालेला निधी जर्मनीकडून शस्त्रे घेण्यासाठी वापरण्यात येणार होता. त्यानंतर बहुतेक एचआरए नेत्यांना अटक करण्यात आली आणि त्यापैकी बिस्मिलसह चार जणांना १९२७ मध्ये ब्रिटिशांनी फाशी दिली. फाशी देण्यापूर्वी बिस्मिल यांनी कोठडीत त्यांचे आत्मचरित्र लिहिले जे तुरुंगातून तस्करी करुन बाहेर आणण्यात आले आणि प्रताप प्रेसने प्रकाशित केले.
आमची बिस्मिलच्या विचारसरणी बद्दलचे आकलन आणि दृष्टिकोन हे मुख्यतः शेवटच्या क्षणांत त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रावर आधारित आहे. अमेरिकन साहित्यिक समीक्षक जोसेफ टी. शिपले यांनी लिहिल्याप्रमाणे “अस्सल आत्मचरित्र ही लेखकाच्या आयुष्याचा प्रवास रेखाटताना, एका विस्तृत पार्श्वभूमीवर आपल्या जीवनाचे महत्व काय होते यबद्दल केलेल्या आत्मनिरीक्षणांवर भर देते.”
आत्मचरित्रांमध्ये असे अनुभव, निरीक्षणे आणि घटना असतात जे लेखकाचे आयुष्य घडविण्यात महत्त्वपुर्ण भूमिका बजावतात. आम्हाला विश्वास आहे की बिस्मिलचे आत्मचरित्र हा त्यांच्या जीवनाचा आणि राजकीय प्रवासाचा सार आहे आणि म्हणूनच त्यांच्या वैचारिक कलाचे विश्लेषण करण्यासाठी ते वापरले जाऊ शकते.
सांप्रदायिकतेची टीका आणि जातीय सलोख्याची कास
साम्राज्यवादविरोधी संघर्षाच्या इतिहासात सांप्रदायिकतेचा प्रश्न महत्त्वाचा ठरला आहे. १९२० च्या दशकात वाढणारे हिंदू-मुस्लिम तणाव आणि सततची दंगल या प्रश्नाला क्रांतिकारक चळवळीलाही सामोरे जावे लागले. सीएएविरोधात झालेल्या निषेधा दरम्यान रामप्रसाद बिस्मिल आणि त्याचे मित्र व कॉम्रेड अशफाकउल्ला खान हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आणि उत्तर भारतातील संमिश्र संस्कृतीचे प्रतिनिधी (गंगा-जमुना तहजीब) म्हणून साजरे केले गेले.
१९ डिसेंबर १९२७ रोजी काकोरी कटातील नेते अशफाकउल्ला खान, राम प्रसाद बिस्मिल आणि रोशन सिंह यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली.
बिस्मिल हे आर्यसमाजाचे सदस्य होते आणि त्यांनी संस्थेच्या शुद्धी (धर्मांतरण) कार्यक्रमात भाग सुद्धा घेतला होता. त्यांच्या काळातील बर्याच लोकांप्रमाणे, तीव्र धर्मांध वातावरणामुळे मुस्लिम समुदायाबद्दल त्यांच्या मनात खोलवर संशय होता. मात्र अशफाकउल्ला खानबरोबरच्या त्यांच्या मैत्रीमुळे त्यांचे विचार बदलले. आपल्या आत्मचरित्रातील अशफाक यांना समर्पित केलेल्या भागात बिस्मिल मुस्लिमांबद्दलच्या त्यांच्या सुरुवातीच्या संशयाबद्दल लिहितात. अशफाकउल्लाशी असलेल्या त्यांच्या मैत्रीबद्दल ते लिहितात,
“मला संशय होता की महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या मुस्लिम विद्यार्थ्याने माझ्याशी [क्रांतिकारक कारवायां] विषयी बोलण्याची इच्छा का दर्शविली, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे तिरस्काराने दिली … मुस्लिम असल्याने माझ्या काही मित्रांनी तुम्हाला नापसंत केले होते…”
परंतु ब्रिटिशविरोधी कारवाया आणि अशफाकशी मैत्री जसजशी वाढत गेली तसतशी बिस्मिलने धार्मिक पक्षपातीपणा सोडून सर्वधर्मसमभावाच्या सिद्धांतावर धर्मनिरपेक्षतेकडे वाटचाल केली. बिस्मिलने या परिवर्तनाबद्दल लिहिले आहे; “तुझ्या मैत्रीने… मला खात्री झाली आहे की हिंदू आणि मुस्लिम यात काही फरक नाही”.
त्यांच्या कवितेच्या दोन ओळी:
हिंदु और मुसलमान मिल कर जो चाहें सो कर सकते हैं
ए चरखा-कुहन होसियार हो तू, पुरज़ोश हमारे नाले है
(हिंदु आणि मुस्लिम मिळून काहीही करू शकतात
हे काळा, तू आमच्यापासून सावध रहा आमचा निर्धार दृढ आहे)
आणि
मुहम्मद पर सब-कुछ कुर्बान, मौत के हों तो हों मेहमान
कृष्णा की मुरली सुन तान चलो, हो सब मिलकर बलिदान
(मोहम्मदला सर्व काही त्याग करा, वेळ आली तर मृत्यूचे पाहुणे होऊ
कृष्णाच्या बासरीमध्ये तल्लीन होऊन सर्व मिळून बलिदान देऊ)
जरी बिस्मिल यांच्या वैयक्तिक जीवनावर आर्य समाजाचा खोलवर प्रभाव होता, तरीही राजकारणात मात्र ते धर्मनिरपेक्ष झाले. १९२० च्या दशकाच्या सुरुवातीपासून, संयुक्त प्रांतातील (आजचे उत्तर प्रदेश) दोन भिन्न राजकीय धारांच्या क्रांतिकारक उभे राहिले – एक म्हणजे हिंदू सांप्रदायिक संघटना आणि तुलनेने धर्मनिरपेक्ष स्वरूपाचा स्वराज पक्ष. १९२५ च्या नगरपालिका निवडणुकीत हिंदू सांप्रदायिकतेचा विजय झाल्यामुळे प्रांतात धार्मिक तणाव वाढला होता आणि त्यामुळे अनेक दंगली झाल्या.
संवैधानिक पद्धतीने संघर्ष करण्याच्या पद्धतीवर हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन टीका जरी करत असला तरी बिस्मिलने शाहजहांपूर जिल्हा मंडळासाठी उमेदवारी अर्ज स्वराज पक्षाच्या वतीने दाखल केला. पुढे, बिस्मिलने अशफाकउल्ला खान यांच्यासमवेत रोहिलखंड भागातील दंगलीग्रस्त भागात जातीय सलोख्याची मोहीम हाती घेतली. धार्मिक राजकारणाबद्दल बिस्मिलचा तिरस्कार आणखीनच स्पष्ट होता कारण त्याने म्हटले आहे की ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक हिंदु-मुस्लिम फूटीचा वापर भारतावरील त्यांचे राज्य अधिक मजबूत करण्यासाठी केला. सांप्रदायिक हिंसाचारात भाग घेणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याचे बिस्मिलने समर्थन केले.
बिस्मिलच्या विचारसरणीच्या केंद्रस्थानी सांप्रदायिक सौहार्द होता. बिस्मिल यांनी त्यांच्या आत्मचरित्रात वारंवार हिंदू आणि मुस्लिमांना एकमेकांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आणि अशी आशा व्यक्त केली की त्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी केलेल्या त्यागाने हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदाय एकत्र येण्यास मदत होईल.
जातीवाद आणि लिंगभाव-आधारित भेदभावाची टीका
बिस्मिलच्या क्रांतिकारक राजकारणाची माहिती देणारी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ती जात आणि लिंगभाव संबंधांबद्दलची मते. बिस्मिलच्या आजीने स्वतःच्या पुराणमतवादी पारंपारिक पितृसत्ताक मर्यादा तोडल्या आणि नोकरीसाठी घराबाहेर पडल्या. त्यांच्या आईनेसुद्धा मुलींना शिक्षित करण्यासाठी बराच संघर्ष केला. या पार्श्वभूमीवर बिस्मिलने जुन्या परंपरा कायम ठेवण्याच्या नावाखाली जाती आणि लिंगभाव आधारित होणार्या शोषणावर कडाडून टीका केली.
बिस्मिलने आत्मचरित्राच्या सुरुवातीच्या पानात लिहिले आहे की, ‘उच्च’ जातीच्या कुटूंबातील स्त्रिया … चेहर्यावर कोपरभर लांबीचा पडदा न घालता घराबाहेर पडण्याची हिम्मतही करणार नाहीत. खालच्या जातीतील शूद्र स्त्रियांसाठीही पडदा अनिवार्य नियम होता. वेगवेगळ्या वर्गातील स्त्रियांच्या कपड्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत जे शूद्र स्त्रिया अगदी दुरूनही ओळखू शकतील. या परंपरा इतक्या व्यापकपणे स्वीकारल्या गेल्या की त्या आता निरंकुशपणे छळ करणार्या झाल्या आहेत.”
पुढे त्यांनी ‘खालच्या जातीच्या’ कुटुंबातील स्त्रियांना उच्चवर्णीय जमींदार (जमीनदार) ‘दागिने’ घातल्याबद्दल ‘शिक्षा’ कशी देत होते यावर भाष्य केले; कारण केवळ उच्च जातीच्या स्त्रियांनाच दागिने घालण्याचा अधिकार होता. त्यांनी लिहिले की, “हे जमींदार अशिक्षित असूनही, ते त्यांच्या बनावट जातीचा अभिमान बाळगतात.”
रोजच्या आयुष्यातल्या इतर बऱ्याच जातीवादी प्रथा आहेत ज्यांचा बिस्मिलने त्यांच्या आत्मचरित्रात निषेध केला आहे. बुंदेलखंडमधील पुराणमतवादी सरंजामशाही समाजात प्रचलित ‘प्रतिष्ठेच्या नावार होणारे खून’ करण्याच्या प्रथेवरही त्यांनी टीका केली. बिस्मिलने लिहिले की केवळ व्यभिचाराच्या संशयावरून किंवा ‘अयोग्य वागणुकी’वरून महिला व मुलींना ठार मारण्यात आले; विधवेला केवळ अनैतिक वर्तनाच्या संशयावरून गरोदर अवस्थेतसुद्धा ठार मारण्यात येत असे.
या निरीक्षणाच्या पार्शभूमीवर, बिस्मिल ‘स्वातंत्र्या’च्या अर्थाबद्दल अतिशय महत्त्वाचे भाष्य करतो ज्याची त्याने आपल्या संक्षिप्त आत्मचरित्रात दीर्घकाळ चर्चा केली आहे. बिस्मिल अतिशय समर्पक प्रश्न विचारतो; “ज्या देशामध्ये जवळपास ६० लाख “माणसं” अस्पृश्य मानले जातात त्या देशाला स्वतंत्र होण्याचा अधिकार आहे का?” बिस्मिलच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेत सामाजिक न्याय हा महत्वपुर्ण घटक आहे. त्यांनी “अस्पृश्य” समजल्या जाणाऱ्या ६० लाख लोकांच्या शिक्षणासाठी योग्य ती व्यवस्था करण्याची आणि त्यांना समान सामाजिक-आर्थिक अधिकार देण्याची मागणी केली.
बिस्मिलने जातीवर आधारित चाललेल्या व्यवसायांच्या विरोधात काहीसा अवास्तव पण अगदी बिनतोड युक्तिवाद केला. शहरी आणि पाश्चात्य जीवनशैलीत गुंतल्याबद्दल ‘तरुणांची’ टीका करताना बिस्मिल त्यांना शहरी भागातील कमी पगाराची नोकरी सोडून खेड्यात परत जाण्यास सांगतो आणि “सुतार, लोहार, शिंपी, परीट, मोची, विणकर, गवंडी आणि कुंभार इ.” या व्यवसाय करण्यास सांगतो.
बिस्मिल यांनी नमूद केले आहे की केवळ जमीनदार आणि श्रीमंत मुलांनाच इंग्रजी शिक्षण परवडते, म्हणून त्यांनी तरुणांनी आपल्या गावी परत जावे आणि “अपवित्र” समजले जात असलेले काम करावे हे त्यांचे आवाहन हेच दर्शविते की ते जातीआधारित शुद्ध-अशुध्दतेच्या पारंपारिक कल्पनेपलिकडे गेले होते. त्याचप्रमाणे, बिस्मिल शिक्षणाद्वारे स्त्रीयांच्या उन्नतीसाठीच्या प्रयत्नांचे समर्थन करतात आणि ते म्हणतात की, “स्त्रीला निरुपयोगी मानणारी” पुरुषसत्ताक विचारधारा उधळण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत.
जरी बिस्मिलला आजी आणि आईबद्दल खूप आदर असला तरी, स्त्रियांबद्दलचे त्यांचे मत ‘आदर्श कौटुंबिक स्त्री’ या पारंपारिक कुलपरंपरागत पर्यंत मर्यादित नव्हते. खरं तर, बिस्मिल दुसऱ्या एका स्त्रीपासून खूप प्रेरित होते, रशियन नरोडनिक नेता कॅथरीन ब्रेशकोव्हस्की – जिने आपल्या मुलाचा त्याग केला आणि क्रांतीसाठी नवऱ्याला घटस्फोट दिला. बिस्मिल यांनी कॅथरीनच्या चरित्राचे रशियन क्रांतीची छोटी आजी या नावाने हिंदीमध्ये भाषांतर केले आणि त्यांच्या लेखनात भारतातील जन-क्रांतिकारक चळवळ उभारण्याचे मॉडेल म्हणून तिच्या कित्येक पुढाकारांचा उल्लेख केला.
क्रांती आणि शिक्षण
बिस्मिलने त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, “क्रांती हा शब्द मुळातच भयानक आहे.” पण ते भयावह का आहे? ‘क्रांती’ या शब्दाची विरोधकांना भीती वाटते कारण ” सरकारला जमीनदार आणि श्रीमंत लोकांकडून समर्थन मिळते आणि क्रांतीचा अर्थ असा आहे की ते [श्रीमंत आणि जमीनदार] त्यांची शक्ती आणि ऐषोआरामापासून वंचित होतील”. बिस्मिलच्या मते, “जमीनदार आणि भारतातील श्रीमंत ब्रिटीश सरकारच्या बाजूने झुकलेले होते”.
बिस्मिलसाठी क्रांती म्हणजे केवळ सामाजिक-आर्थिक व्यवस्थेतील बदलच नव्हे तर माणसाची चेतना बदलणे देखील होते; “मानव समाज सामूहिक क्रियांचे उत्पादन आहे, याच क्रिया त्यांचा समाजाबद्दल दृष्टीकोन बनवितात, या दृष्टीकोनाला धोका असल्यास मानव त्याचा प्रतिकार करतो” आणि म्हणूनच क्रांती हा शब्द सर्वसामान्यांसाठीसुद्धा भीतीदायक आहे.
सामाजिक क्रांतीसाठी भारतीय क्रांतिकारक चळवळीतील अपयशाबद्दल विचार करताना बिस्मिल म्हणतो:
“भारतीय समाजात क्रांतिकारक चळवळीसाठी आवश्यक असलेल्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय परिस्थितींचा अभाव आहे यात काही शंका नाही.”
बिस्मिलच्या मते या प्रतिकूल परिस्थितीचे कारण हे भारतीय जनतेत शिक्षणाचा अभाव आहे. जनतेला सक्षम बनविण्यासाठी व्यापक शैक्षणिक कार्यक्रम हाती घेणे हे क्रांतिकारक संघटनेचे कार्य बनते जेणेकरुन जनता सरकारच्या धोरणांची गंभीरपणे समीक्षा करु शकेल, स्वत:चे हित ओळखू शकेल, विद्यमान ब्रिटीश सरकार काढून टाकायचे कि ठेवायचे यावर ते निर्णय घेऊ शकतील आणि सरकार कसे काढून टाकता येईल याच्या पध्दतीवर निर्णय घेऊ शकतील. बिस्मिलसाठी शिक्षण ही क्रांतीची पूर्वअट होती.
तरुणांनी त्यांच्या बंदुकीच्या प्रेमापोटी क्रांतिकारक पक्षात सामील होण्याच्या रोमँटिसिझमवर टीका करताना बिस्मील यांनी यावर भर दिला की क्रांतिकारक पक्षाचे कार्य “जमीनदार व श्रीमंत [भांडवलदार] यांच्या कडून होणारे शोषण रोखण्यासाठी शेतकरी आणि कामगारांना संघटित करणे आहे.”.
बिस्मिलच्या मते क्रांतिकारकांनी “गावपातळीवरील समित्यांमध्ये शेतकर्यांना संघटित करणे आणि त्यांना दैववादाच्या पलीकडे जाण्यासाठी आणि क्रियाशील होण्यासाठी शिक्षित करण्याचे उद्दीष्ट ठेवले पाहिजे. त्यांनी [कामगार] संघटनांमध्ये कारखाना, खाण, रेल्वे आणि शिपयार्ड कामगार यांना संघटीत करण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे जेणेकरून ते मालकांच्या [भांडवलदारांच्या] [वर्ग] शोषणाविरूद्ध चेतना विकसित करू शकतील आणि लढा देऊ शकतील.”
रशियामधील कॅथरीन ब्रेश्कोव्हस्की यांच्या कार्यातून बिस्मिल मोठ्या प्रमाणात प्रेरित झाले. क्रांतिकारक तरुणांनी ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनात मिसळुन त्यांना संघटित केले पाहिजे असा प्रस्ताव त्यांनी ठेवला. ज्यात कॅथरीनने केलेया कामाचे उदाहरण बिस्मिलने दिले आहे.
बिस्मील हे भांडवली समाजातील लोकशाही आणि समाजवादी लोकशाही यात फरक करतो. वर्गावर आधारित सरकारांच्या स्वरूपावर भाष्य करताना बिस्मिल यांनी अमेरिकन व फ्रेंच क्रांतीचे उदाहरण दिले जेथे “राजसत्ता उधळल्यानंतर प्रजासत्ताक सरकार स्थापन करण्यात आले पण क्रांतीनंतर श्रीमंत लोक सरकारवर आपले वर्चस्व स्थापित करू शकले. कारण त्यांनी वृत्तपत्रे, उद्योग आणि खाणींवर आपले नियंत्रण वाढवले ज्यामुळे कामगार वर्गाचे तीव्र शोषण झाले. “
बिस्मिलच्या मते या प्रक्रियेत राजेशाहीची जागा भांडवलावर आधारित राज्य घेते. पण इतर क्रांत्याप्रमाणे बोल्शेविक क्रांतीमध्ये हे होत नाही त्यामुळे त्या क्रांतीची बिस्मिल प्रशंसा करतो. ते म्हणतात “रशियन क्रांतिकारकांना भांडवलशाहीच्या या पद्धतीची जाणीव होती, म्हणूनच त्यांनी सर्वप्रथम राजेशाहीविरुद्ध लढा उभारला आणि प्रजासत्ताक लोकशाही प्रस्थापित केली, त्यानंतर राज्यकारभारावर श्रीमंत लोक जसे दबाव वाढवू लागले, तसे [रशियन क्रांतिकारकांनी] त्यांच्या शीदेखील लढा दिला आणि खरी लोकशाही प्रस्थापित केली.”
१९१६ मध्ये अमेरिकन क्रांतीचे गौरव करण्यापासून त्याच क्रांतीचे टीकात्मक पुनरावलोकन करण्यापर्यंत त्यांच्या विचारसरणीत हा उल्लेखनीय बदल होता. हा बदल भारतीय क्रांतिकारकांच्या वैचारिक विकासाचं एक प्रातिनिधिक लक्षण आहे.
बिस्मिल निःसंशयपणे समाजवादी विचारांनी प्रभावित होते, परंतु त्यांची समाजवादाबद्दलची समज द्वंद्वात्मक भौतिकवादी दृष्टीकोनावर आधारित नव्हती. समाजवाद आणि साम्यवाद या त्यांच्या विचारांवर बिस्मिलच्या अध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनाचा प्रभाव होता. बिस्मिलसाठी, साम्यवादाचे समतावादी आदर्श त्यांच्या अध्यात्मिक आदर्शांशी मिळतेजुळते होते; म्हणून त्यांच्या अटकेच्या वेळी पोलिसांनी जप्त केलेल्या एका हस्तलिखित लेखात ते असे लिहितात की “सर्वत्र कम्युनिस्ट समाज स्थापन केला पाहिजेत (….) साम्यवादाचा प्रचार करणे हा हिंदूंचा धार्मिक अधिकार आहे आणि त्यापासून वंचित राहणे म्हणजे हिंदू धर्माची हानी करणे होय ”
अलीकडे वि.दा. सावरकर यांचे समर्थक आणि हिंदुत्ववादी लोक बिस्मिलने ब्रिटिशांना पाठवलेल्या तथाकथित ‘माफीनाम्या’चा मुद्दा बनवू पाहत आहेत. अशाप्रकारे सावरकर यांनी स्वत:ला ‘ब्रिटीशांचा बिघडलेला पुत्र’ म्हणून ब्रिटीशांची जी चाटूगिरी केली त्य़ा आरोपातून बिस्मिल चे उदाहरण देऊन सावरकरांना दोषमुक्त करु इच्छितात.
बिस्मिलने प्रिव्हि कौन्सिलकडे दयेचे आव्हान खरोखरच केले होते, परंतु ते त्यांच्या आत्मचरित्रात लिहिल्याप्रमाणे “राजकारण हा बुद्धिबळाचा खेळ आहे, आणि कधीकधी बुद्धिबळात तुम्हाला आपल्या प्याद्याचा बळी द्यावा लागतो… मला माहित होतं की आम्हाला मृत्यूदंड ठोठावला जाईल पण आम्हाला फक्त सरकारचा पर्दाफाश करायचा होता. सरकारने असा दावा केला होता की माफी मागणाऱ्या क्रांतिकारकांना क्षमा केली जाईल… आमच्या याचिकेचा परिणाम (बिस्मिलची फाशी) ब्रिटीश सरकारचे दुटप्पी धोरणचं उघड करते.”
बिस्मिलने त्यांच्या आत्मचरित्रात चार वेगवेगळ्या घटना सांगितल्या आहेत ज्यामध्ये अटकेत असताना ते तिथून निसटू शकले असते. पोलिस कर्मचार्यांच्या आळशीपणा आणि अव्यावसायिक मनोवृत्तीमुळे चारही संधी उद्भवलेल्या होत्या. परंतु बिस्मिलने त्यांच्या आळशीपणा आणि अव्यावसायिक वृत्तीचा ‘विश्वास’ म्हणून अर्थ लावला आणि ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे त्यांच्या शी विश्वासघात न करण्याचा आणि अयोग्य फायदा न घेण्याचा निर्णय घेतला(आणि ते पळून गेले नाही!).
बिस्मिलचा थेट विरोधाभास म्हणजे सावरकरांनी सुटका झाल्यानंतर स्वत:ला केवळ साम्राज्याचा “अनोखा पुत्र” असल्याचे सिद्ध केले नाही तर त्यांनी भारतीय समाजात सांप्रदायिक विष पसरवायलासुद्धा सुरुवात केली; जे बिस्मिलने आपल्या देशवासीयांना दिलेल्या शेवटच्या संदेशाच्या पुर्णत: विरूद्ध होते. १९३७ पासून सावरकर यांनी त्याच हिंदू महासभेचे नेतृत्व केले ज्यांच्या सांप्रदायिक राजकारणाविरूद्ध बिस्मिल आणि अशफाकने १९२० च्या दशकात प्रचार केला होता. अशा प्रकारे, सावरकरांनी बिस्मिलचादेखील विश्वासघात केला.
भारतीय क्रांतिकारक चळवळीच्या इतिहासात रामप्रसाद बिस्मिलला अतिशय वेगळे स्थान आहे. चौरीचौरा घटनेनंतर अचानकपणे असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर भारतीय क्रांतिकारक चळवळ ज्या संक्रमण अवस्थेतून जात होती त्या अवस्थेचे मूर्त रूप बिस्मिल होय.
आपण या संक्रमणाचे किमान तीन भिन्न धागे काढू शकतो. प्रथम, ब्रिटीशविरोधी राष्ट्रवादापासून समाजवादाकडे जाणे. दुसरे, भूमिगत क्रांतिकारी चळवळीतून जनतेची चळवळ उभी करण्याकडे आणि तिसरे, धर्मप्रेरित सक्रियतेपासून धर्मनिरपेक्षतेकडे जाणे आणि शेवटी भगतसिंग च्या मार्गाने नास्तिकतेकडे जाणे.
(हर्षवर्धन त्रिपाठी हे सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोशल सिस्टम्स, जेएनयू येथील संशोधन अभ्यासक आहेत आणि प्रबल सरन अग्रवाल हे जेएनयू च्या ऐतिहासिक अभ्यास केंद्राचे संशोधन अभ्यासक आहेत.)
(इंग्रजी लेखाचा हा स्वैर मराठी अनुवाद आहे. इंग्रजी लेख https://janataweekly.org/ramprasad-bismils-idea-of-revolution-is-impervious-to-saffronisation/ हा आहे.