जोसेफ ‘पेपे’ मुजिका यांच्या निधनानंतरचा शोकसंदेश आणि त्यांचा वारसा

क्युबन राष्ट्राध्यक्ष मिगेल दियाझ-कानेल यांनी उरुग्वेचे प्रसिद्ध नेते जोसेफ ‘पेपे’ मुजिका यांच्या निधनानंतर शोकसंदेशात म्हटले: “त्यांचे असामान्य जीवन वॉशिंग्टनच्या पाठिंब्याने चाललेल्या काळ्या लष्करी हुकूमशाहीच्या काळाची आठवण करून देते.” याचे स्मरण प्रगतिशील शक्तींना मुख्य प्रवाहातील माध्यमांनी तयार केलेल्या सापळ्यापासून वाचवण्यासाठी आवश्यक आहे. 13 मे रोजी मुजिका यांच्या निधनानंतर, बीबीसी आणि अल जझीरा यांसारख्या काही माध्यमांनी त्यांना फक्त “जगातील सर्वात नम्र (किंवा गरीब) राष्ट्राध्यक्ष” म्हणून साजरे केले. परंतु हा simplistic नरेटिव्ह एक गहन सत्य लपवते: त्यांच्या साध्या जीवनशैलीच्या मागे एक क्रांतिकारी आत्मा होता, जो कधीही आपल्या क्रांतिकारी तत्त्वांपासून विचलित झाला नाही. अनेक माजी गुरिल्ला (गणिमी काव्याने लढणारे) नेत्यांनी मुख्य प्रवाहातील राजकारणात प्रवेश केल्यानंतर आपली तत्त्वे सोडली, परंतु मुजिका यांनी आपली पद्धत बदलली तरी त्यांचा मूळ गाभा कायम ठेवला. सशस्त्र प्रतिकारापासून राजकीय नेतृत्वापर्यंत 1935 मध्ये माँटेव्हिडीओ येथे जन्मलेल्या मुजिका यांनी 1960 च्या दशकात टुपमारोस या शहरी गुरिल्ला चळवळीत सहभाग घेतला, जी उरुग्वेच्या भांडवलशाही व्यवस्थेला आव्हान देणारी होती. क्युबन क्रांतीपासून प्रेरित होऊन, टुपमारोसने देशद्रोही शासनाविरुद्ध रणनीतिक कारवायांद्वारे भांडवलशाही संरचनांना आव्हान दिले. मुजिका यांच्या अटल बांधिलकीमुळे त्यांना जवळपास पंधरा वर्षे तुरुंगवास भोगावा लागला, ज्यात अनेक वर्षे अमानवीय परिस्थितीत एकाकी कारावासात घालवली, अशामध्ये एखादी कमजोर व्यक्ती पूर्णपणे खचली असती. सामान्य नरेटिव्ह आपल्याला असे सांगण्याचा प्रयत्न करते की: “1985 मध्ये उरुग्वेमध्ये लोकशाही परत स्थापित झाली तेव्हा मुजिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सशस्त्र संघर्ष सोडून निवडणू्कीच्या राजकारणाकडे रणनितीपूर्वक शिफ्ट झाले, ज्यामुळे ते ब्रॉड फ्रंट (फ्रेंटे अँप्लियो) युतीत सामील झाले.” परंतु हा नरेटिव्ह यामागील सत्य लपवण्याचा प्रयत्न करते की, ‘लोकशाही’ ही ऑपरेशन काँडोरच्या पराभवाचा परिणाम होती, ज्यामध्ये गुरिल्ला चळवळीने आणि सामान्य लोकांच्या संघर्षांनी मोलाची भूमिका बजावली. हा बदल म्हणजे क्रांतिकारी आदर्शांचा त्याग नव्हता, तर रणनीतीतील उत्क्रांती होती. मुजिका यांनी सातत्याने सांगितले की त्यांच्या गुरिल्ला भूतकाळाबद्दल त्यांना कोणतीही खंत नाही, कारण त्यांनी जे केले ते राज्याच्या दडपशाही आणि संस्थागत अन्यायाला आवश्यक प्रतिकार मानत होते. त्यांनी सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्यभर समर्पण दाखवले. क्रांतिकारी शासन 2010 ते 2015 या काळात त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात, मुजिका यांचा क्रांतिकारी दृष्टिकोन धाडसी धोरणात्मक निर्णयांमध्ये दिसून येतो. त्यांच्या प्रशासनाने कायदेशीर सुधारणा केल्या, ज्या मवाळ सुधारणा नव्हत्या, तर सार्वभौमत्व आणि लोकांच्या हक्कांचा ठामपणे पुनरुच्चार होता. नव-उदारमतवादाविरुद्ध कसलीही तडजोड केली नाही: राज्यशक्ती ही लोकांची सेवा करण्यासाठी आहे, ना की अभिजनांना (श्रीमंताना) आणखी श्रीमंत करण्यासाठी. मुजिका यांनी आपला 90% राष्ट्राध्यक्षीय पगार सामाजिक कार्यासाठी दान केला आणि राष्ट्राध्यक्षीय राजवाड्याऐवजी आपल्या साध्या शेतघरात राहणे पसंत केले, यामुळे त्यांचा विश्वास दिसून येतो की राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांच्या भोतिक परिस्थितीशी एकरूप राहावे. हे केवळ प्रतीकात्मक नव्हते, तर क्रांतिकारी प्रॅक्सिस (व्यवहार) होते – सत्तेच्या आकर्षणाचा जाणीवपूर्वक नकार. त्यांची उपभोक्तावादावरील टीका ही निव्वळ उदारमतवादी भुमिका नव्हती; ते नव-उदारमतवादाचे कट्टर टीकाकार होते आणि त्यांचा विश्वास होता की पृथ्वीचे रक्षण केवळ चंगळवादी व्यवस्थेला थांबवूनच शक्य आहे, जी प्रामुख्याने ग्लोबल नॉर्थच्या (अमेरिका, युरोप इ.) सेवेत आहे. त्यांचे परराष्ट्र धोरण साम्राज्यवादविरोधी राहिले, ज्यामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांना आव्हान देणे आणि जागतिक भांडवलशाहीविरुद्ध लॅटिन अमेरिकन एकजुटीचा पुरस्कार करणे समाविष्ट होते. आंतरराष्ट्रीय मंचांवर, त्यांची भाषणे क्रांतिकारी व्यक्तींची आठवण करून देत होती, ज्यात चंगळवाद आणि पर्यावरणीय नाशावर तीव्र टीका होती, तसेच दडपशाहीखालील लोकांना जागतिक एकजुटीसाठी आवाहन होते. याशिवाय, मुख्य प्रवाहातील माध्यमांनी व्हेनेझुएलाच्या सरकारवरील त्यांच्या टीकेचा अतिशयोक्तीपूर्ण आणि संदर्भहीन प्रचार केला; परंतु त्यांनी ‘चाविस्टा’ चळवळीचे कौतुक केले आणि बोलिव्हेरियन क्रांती पुढे नेण्यासाठी मादुरो यांच्या प्रयत्नांना चाव्हेज यांचे कायदेशीर उत्तराधिकारी म्हणून मान्यता दिली, याकडे माध्यमांनी दुर्लक्ष केले. क्रांतिकारी वारसा मुजिका यांचा मार्ग हा एक शक्तिशाली उदाहरण आहे की राजकीय संस्थांमध्ये प्रवेश केल्याने क्रांतिकारी आदर्शांचा भ्रष्टाचार होतो हा समज चुकीचा आहे. त्यांनी दाखवून दिले की सत्तेचा उपयोग क्रांतीच्या संघर्षाला धोका न देता केला जाऊ शकतो. मुजिका यांच्यासाठी क्रांती कधीच संपली नाही – ती बदलत्या परिस्थितींनुसार विकसित झाली. न्याय, समानता आणि साम्राज्यवादविरोधी बांधिलकी त्यांच्या सत्तेत येण्याने कधीही तडजोड केली गेली नाही, ज्यामुळे ते खरे क्रांतिकारी ठरले ज्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या तत्त्वांशी निष्ठा राखली. मुजिका यांचा साधेपणा ही क्रांतिकारी आदर्शांपासून माघार नव्हती, तर त्यांची सर्वोच्च अभिव्यक्ती होती – भांडवलशाहीच्या अतिरेकाविरुद्ध प्रतिकाराचे जिवंत प्रतीक आणि समकालीन राजकारणात क्रांतिकारी मूल्यांच्या चिरस्थायीत्वाचा महत्त्वाचा पुरावा. ———————****———————– *‘माझ्या पिढीने एक भोळी चूक केली’ – जोसेफ मुजिका* माझ्या पिढीने एक भोळी चूक केली. आम्हाला वाटले की सामाजिक बदल केवळ समाजातील उत्पादन आणि वितरण पद्धतींना आव्हान देण्याचा प्रश्न आहे. आम्हाला संस्कृतीच्या प्रचंड भूमिकेचे आकलन झाले नाही. भांडवलशाही ही एक संस्कृती आहे, आणि आम्ही भांडवलशाहीला वेगळ्या संस्कृतीने उत्तर देऊन प्रतिकार केला पाहिजे. दुसऱ्या शब्दांत: आपण एकजुटीची संस्कृती आणि स्वार्थाची संस्कृती या दोन संस्कृतींमधील संघर्षात आहोत. मी येथे व्यावसायिक संगीत किंवा नृत्यासारख्या विकल्या जाणाऱ्या संस्कृतीबद्दल बोलत नाही. हे सर्व महत्त्वाचे आहे, अर्थातच, परंतु जेव्हा मी संस्कृतीचा उल्लेख करतो, तेव्हा मी मानवी संबंधांचा, त्या कल्पनांचा संदर्भ देतो ज्या आपल्या नकळत आपल्या नातेसंबंधांना नियंत्रित करतात. हा एक अव्यक्त मूल्यांचा संच आहे जो जगभरातील लाखो अनाम व्यक्तींच्या परस्परसंबंधांचा मार्ग ठरवतो. चंगळवाद हा त्या संस्कृतीचा भाग आहे. ही भांडवलशाहीच्या अंतहीन संचयाच्या लढ्यासाठी आवश्यक नीतिमत्ता आहे. भांडवलशाहीसाठी सर्वात मोठी समस्या असेल जर आपण खरेदी करणे थांबवले किंवा खूप कमी खरेदी केले. आणि यामुळे चंगळवादी संस्कृती निर्माण झाली आहे जी आपल्याला घेरते. परंतु भांडवली सामाजिक व्यवस्था केवळ मालमत्तेच्या संबंधांपुरती मर्यादित नाही; ती समाजात सामान्य असलेल्या अव्यक्त मूल्यांचा संच आहे. ही मूल्ये कोणत्याही सैन्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहेत आणि ती आज भांडवलशाही टिकवून ठेवणारी मुख्य शक्ती आहे. माझ्या पिढीला वाटले की आम्ही माध्यमे आणि वितरणाचे राष्ट्रीयीकरण करून जग बदलू, परंतु आम्हाला हे समजले नाही की या लढ्याच्या केंद्रस्थानी वेगळ्या संस्कृतीची निर्मिती असली पाहिजे. तुम्ही भांडवली विचारसरणीच्या गवंड्यांकडून समाजवादी इमारत बांधू शकत नाही. का? कारण ते लोखंडी सळ्या चोरतील, सिमेंट चोरतील, कारण ते फक्त स्वतःच्या समस्या सोडवण्याकडे पाहतात, कारण आपण तसे घडवले गेले आहोत. माझी पिढी, इतिहासाच्या प्रोग्रामॅटिक (साचेबद्ध) दृष्टिकोनाने घडलेले विवेकवादी, हे समजू शकली नाही की माणूस अनेकदा आपल्या अंतःप्रेरणेने निर्णय घेतो आणि नंतर त्याची बुद्धी त्या निर्णयांचे औचित्य सिद्ध करण्यासाठी युक्तिवाद तयार करते. आपण आपल्या हृदयाने निवडतो, आणि येथे संस्कृती महत्त्वाची ठरते कारण ती आपल्या अतार्किकतेचे संतुलन राखते. उदाहरणार्थ, आमच्या डाव्या नेत्यांचे काय झाले? डावे नेते आजारी आहेत आणि त्याच संस्कृतीत बुडालेले आहेत, आणि म्हणूनच त्यांचे जीवन त्यांच्या संघर्षाशी सुसंगत संदेश देत नाही. पाहा, जेव्हा मी राष्ट्राध्यक्ष होतो तेव्हा त्यांनी मला गरीब म्हटले, परंतु त्यांना काहीच समजले नाही! मी गरीब नाही. गरीब तो आहे ज्याला खूप काही हवे आहे. माझे ध्येय आहे स्टोइक (आत्मसंयमी, संतवृत्ती) असणे. आणि खरे तर, हे जग जर संयमाने जगायला, उधळपट्टी थांबवायला, वाया घालवणे थांबवायला शिकले नाही, तर आपले जग टिकणार नाही. पैशाची लालसा आपल्याला नवीन गोष्टी खरेदी करण्यास प्रवृत्त करते, परंतु पृथ्वीचे जीवन टिकवण्यासाठी आपण आपल्याला जगण्यासाठी किती गोष्टींची आवश्यकता आहे हे लक्षात ठेवून आणि आपली संसाधनांचा अपव्यय न करता जगायला शिकले पाहिजे. आता, तुम्ही पाहू शकता, हा लढा एक सांस्कृतिक महाकाव्य आहे. डाव्यांनी एक वेगळी विचारसरणी (संस्कृती) निर्माण केली पाहिजे. याचा अर्थ भांडवलशाहीशी असलेले आपले नाते तोडून टाकणे. आमच्या कल्पनांमध्ये सर्जनशीलता संपली आहे. आम्हाला भांडवलशाहीप्रमाणेच करायचे होते, पण अधिक समानतेने. शेवटी, हे सर्व आपण चांगले जीवन कशाला मानतो, आपण जीवनात कोणत्या मूल्यांचा आदर करू शकतो, आपण कशाची आकांक्षा बाळगू शकतो याच्याशी संबंधित आहे. याचा अर्थ मर्यादांची जाणीव असणे. ग्रीक लोक म्हणायचे तसे, काहीही जास्त नको. डाव्यांनी पर्यायी मूल्यांशी निष्ठा ठेवली पाहिजे, आणि म्हणूनच मी संस्कृतीच्या समस्येवर, बांधिलकीच्या समस्येवर आणि भांडवलशाही ज्याला किंमत देत नाही अशा जीवनातील काही क्षेत्रांना महत्त्व देण्यावर जोर देतो. आपल्या समाजांमध्ये खूप दुःख आहे, श्रीमंत लोकसुद्धा दुःखी आहेत . आपण अतिपोषित लोक आहोत, आपण निर्माण करत असलेल्या कचऱ्याने समाज तुंबला आहे. आपण सर्व काही दूषित करतो, आपण नको असलेल्या गोष्टी खरेदी करतो आणि नंतर बिलं भरण्याच्या निराशेत जगतो. आपण जीवन जगण्याच्या पर्यायी मार्गाचा प्रस्ताव मांडला पाहिजे! माझ्यासाठी, डाव्यांनी आता अधिक क्रांतिकारी असले पाहिजे. याचा अर्थ असा आहे की आपण जसे विचार करतो तसे जगावे. अन्यथा आपण जसे जगतो तसे विचार करू लागतो. हा लढा आहे स्वयं-व्यवस्थापन करणाऱ्या समाजासाठी, स्वतःचे बॉस बनण्यास शिकणे आणि आपले सामायिक (common) प्रकल्प पुढे नेणे. नव्या डाव्यांनी या सर्वांबद्दल चर्चा केल्या पाहिजेत. डावी विचारसरणी अमर आहे, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण ती पूर्वीसारखी नसेल. जे होतं संपलं आहे, तो भुतकाळ आहे! डाव्यांना बदलावे लागेल कारण काळ बदलतो. बदल हीच एकमेव स्थायी गोष्ट आहे. मी नवीन क्रांतिकारी कार्यक्रमांच्या निर्मितीला अडथळे सुचवणार नाही. माझ्याकडे जादूचा फॉर्म्युलाही नाही. मला वाटते की सर्जनशीलतेला प्रोत्साहन दिले पाहिजे, कारण आपण अशा जगात आहोत जिथे जुने डावे नॉस्टॅल्जियावर (भुतकाळातील यशामध्ये (आठवणींमध्ये) रममान) खूप जगतात, ज्यांना आपण का अयशस्वी झालो हे समजणे खूप कठिण असते आणि नवीन मार्गांचा विचार करण्यात खूप अडचण येते. मला वाटते की हा खूप प्रयोगांचा आणि सर्जनशीलतेचा काळ आहे. आणि यासाठी काही मापदंड आपण पाळू शकतो, कारण, मी म्हटल्याप्रमाणे, माझ्या पिढीने संस्कृतीवर पुरेसे लक्ष केंद्रित केले नाही. मी येथे सामान्य आणि साध्या मानवी संबंधांमध्ये अंतर्निहित संस्कृतीचा उल्लेख करतो, जी भांडवलशाहीमध्ये आता केवळ पुढील संचय सुनिश्चित करण्यासाठी दैनंदिन जीवनातील घटनांचा वापर करते. आपण ज्या संस्कृतीत बुडालो आहोत, जी आपल्याला घेरते, ती केवळ वैयक्तिक नफ्याच्या गुणाकारासाठी कार्य करते. आणि ती संस्कृती सैन्य आणि लष्करी शक्ती आणि इतर सर्वांपेक्षा खूपच शक्तिशाली आहे, कारण ती संस्कृती जगभरातील लाखो सामान्य लोकांच्या कायमस्वरूपी नातेसंबंधांना निर्धारित करते. ती अणुबॉम्बपेक्षाही खूप शक्तिशाली आहे! म्हणून, संस्कृतीत बदल न करता व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. आपण एक नवीन व्यवस्था आणि त्याचबरोबर एक नवीन संस्कृती, एक नवीन नीतिमत्ता निर्माण केली पाहिजे, कारण, जर निर्माण करू शकलो नाही, तर सोव्हिएत युनियनबरोबर जे घडले तेच पुन्हा घडेल, जिथे एक क्रांतिकारी चळवळ पूर्ण 360 अंश फिरून त्याच जागी आली – पण खूप वाईट अवस्थेत! आपण त्या पराभवातून शिकले पाहिजे, नाही का?

Janata Weekly does not necessarily adhere to all of the views conveyed in articles republished by it. Our goal is to share a variety of democratic socialist perspectives that we think our readers will find interesting or useful. —Eds.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Email
Telegram

If you are enjoying reading Janata Weekly, DO FORWARD THE WEEKLY MAIL to your mailing list(s) and invite people for free subscription of magazine.